ख्रिसमसच्या सुट्टीपूर्वी भारतीय शेअर बाजारात बुधवारी निराशाजनक वातावरण पाहायला मिळाले. दिवसभर बाजार एका मर्यादित कक्षेत राहिल्याने आणि गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने दोन्ही मुख्य निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले.
व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ११६.१४ अंकांच्या (०.१४ टक्के) घसरणीसह ८५,४०८.७० वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ३५.०५ अंकांच्या (०.१३ टक्के) घसरणीसह २६,१४२.१० च्या पातळीवर स्थिरावला.
परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली सततची विक्री आणि काही प्रमुख क्षेत्रांमधील नफावसुलीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह मावळलेला दिसला. उद्या, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस निमित्त बाजार बंद राहणार असून आता पुढील व्यवहार शुक्रवारी, २६ डिसेंबर रोजी होतील.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट
बाजारातील या किरकोळ घसरणीचा मोठा फटका गुंतवणूकदारांच्या मालमत्तेला बसला आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आधीच्या दिवशीच्या ४७५.७० लाख कोटी रुपयांवरून घसरून ४७४.८२ लाख कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच आजच्या एका दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे ८८,००० कोटी रुपये बुडाले आहेत.
आयटी आणि फार्मा क्षेत्राला फटका
आजच्या व्यवहारात मीडिया आणि मेटल क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण पाहायला मिळाली. आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा दबाव दिसून आला. त्यासोबतच ऑईल अँड गॅस, फार्मा आणि पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये ०.४ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली. ब्रॉडर मार्केटमध्ये बीएसई मिडकॅप इंडेक्स ०.३ टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक स्थिर राहिला.
प्रमुख शेअर्सची कामगिरी –
सेन्सेक्समधील ३० पैकी १३ शेअर्स वधारले असून १७ शेअर्समध्ये घसरण झाली. वधारलेल्या शेअर्समध्ये ‘ट्रेंट’ २.३६ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, पॉवरग्रिड आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे, इंडिगोचा शेअर १.४३ टक्क्यांनी घसरून टॉप लूजर ठरला. तसेच सन फार्मा, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्येही ०.८० ते १ टक्क्यांपर्यंत घट झाली.
मुंबई शेअर बाजारात आज एकूण ४,३३२ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यामध्ये १८,४३ शेअर्स तेजीसह बंद झाले, तर २,३४३ शेअर्समध्ये घसरण झाली. सुमारे १४६ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. विशेष म्हणजे, आज १०२ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर गाठला, तर ११५ शेअर्सनी नवीन उच्चांक प्रस्थापित केला.



