काँगोमध्ये तांबे आणि कोबाल्ट खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. खाणीतील पूल कोसळल्याने खाणीत भूस्खलन झाले अन् ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण या खाणीतील ढिगाऱ्याखाली दबले गेले. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या इशाऱ्यानंतरही खाणीत बेकायदेशीर काम सुरू होते. एकाचवेळी अनेक कामगार पुलावर होते, त्यावेळी अचानक पूल कोसळला अन् एकच हाहाकार उडाला. सगळीकडे आरडाओरड अन् किंकाळ्याने खाण हादरून गेली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल.
व्हिडिओ येथे पहा !
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कांगोमधील लुआलाबा प्रांतातील मुलोंडो येथील कलांडो खाणीतील पूल शनिवारी अचानक कोसळला. लुआलाबाचे गृहमंत्री रॉय कौम्बा मायोंडे म्हणाले की, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या धोक्याबद्दल वारंवार इशारा देण्यात आला होता. सक्त मनाईनंतरही खाणीमध्ये कामगार कामासाठी गेले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैनिकांनी केलेल्या हवाई गोळीबारामुळे खाण कामगारांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि मोठ्या संख्येने लोक पुलावर चढले. त्यामुळे पूल अचानक कोसळला अन् दुर्घटना घडली.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दुर्घटनेत ४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी भयानक होती की पूल कोसळला त्यावेळी कामगार अतिशय उंचीवरून एकमेंकावर पडले. मृतांचा ढिगारा लागला होता. अनेकजण जखमी झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोबाल्ट हा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आणि इतर तंत्रज्ञानात वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये एक प्रमुख घटक आहे. काँगो हा जगातील सर्वात मोठा कोबाल्ट उत्पादक देश आहे. देशातील कोबाल्ट उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के उत्पादन चिनी कंपन्या नियंत्रित करतात. या ठिकाणी बालमजुरी , असुरक्षित कामाच्या परिस्थिती आणि भ्रष्टाचाराचे आरोप अनेक वर्षांपासून केले जात आहेत .



