राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक-१ जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण देशात सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या स्फोटात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेच्या गांभीर्यामुळे केवळ दिल्लीच नाही, तर महाराष्ट्र आणि संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये तातडीने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने तातडीची पाऊले
स्फोटाच्या वृत्तानंतर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात सुरक्षायंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून महाराष्ट्र आणि यूपीमधील इतर जिल्ह्यांमध्येही पूर्वलक्षी खबरदारी म्हणून सतर्कता वाढवण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात कडक बंदोबस्त
उत्तर प्रदेशचे एडीजी अमिताभ यश यांनी माहिती दिली की, पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने निर्देश जारी केले आहेत. “राज्यातील संवेदनशील धार्मिक स्थळे, संवेदनशील जिल्हे आणि सीमावर्ती भागातील सुरक्षा तातडीने वाढवण्यात आली आहे. सर्व सुरक्षा एजन्सीजना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. लखनऊमधून संवेदनशील भागांमध्ये गस्त आणि तपासणी वाढवण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात आले आहेत,” अशी माहिती एडीजी अमिताभ यश यांनी दिली.
घटनेची माहिती आणि तीव्रता
सोमवारी सायंकाळी ७:०५ वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक-१ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाला मिळाली. लाल किल्ला हा जुन्या दिल्लीतील अतिशय गजबजलेला भाग आहे, विशेषतः सण आणि विवाह समारंभाच्या हंगामात इथे मोठी गर्दी असते.
व्हिडिओ येथे पहा !
स्फोटामुळे सहा कार, दोन ई-रिक्षा आणि एक ऑटो रिक्षा जळून खाक झाली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ७:२९ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचे आवाज अनेक किलोमीटर दूर आयटीओपर्यंत ऐकू आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटाच्या ठिकाणी मानवी अवयव विखुरलेले दिसले.
एनआयए टीम घटनास्थळी दाखल
या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेची एक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, एनआयएच्या तपासानंतर यामागे घातपाताचे षडयंत्र आहे का, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.



