दिल्ली येथे लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला आहे, कारमध्ये धमाका झाल्याने भीतीचं वातावरण पसरले आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनचा परिसर हा गर्दीचा परिसर म्हणून ओळखला जातो.
या परिसरात सुरक्षा व्यवस्थाही चोख असते. तरी देखील येथे मोठ्या प्रमाणात स्फोट झाला आहे.
Delhi Red Fort Blast : दिल्ली येथे लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला आहे, कारमध्ये धमाका झाल्याने भीतीचं वातावरण पसरले आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनचा परिसर हा गर्दीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात सुरक्षा व्यवस्थाही चोख असते. तरी देखील येथे मोठ्या प्रमाणात स्फोट झाला आहे.
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ आज संध्याकाळी झालेल्या एका भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. लोकांनी भरलेला परिसर, पर्यटकांची वर्दळ, आणि त्याच वेळी कानठळ्या बसवणारा आवाज एका क्षणात गोंधळ, भीती आणि हाहाकार माजला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या या स्फोटामुळे तीन गाड्यांना आग लागली आहे, आणि मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली पोलिस, अग्निशमन दल, आणि बॉम्ब स्क्वाड सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हा स्फोट आज सोमवारी संध्याकाळी नेमका ६ वाजून ४५ मिनिटांनी झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ च्या अगदी बाहेर, पार्किंग परिसरात उभी असलेली कार अचानक जोरात फुटली. क्षणार्धात आगीचे ज्वाळा उठल्या आणि आसपास उभ्या असलेल्या आणखी तीन वाहनांनाही आग लागली. त्या क्षणी परिसरात असलेल्या नागरिकांनी आरडाओरड करत सुरक्षित स्थळी धाव घेतली. फायर ब्रिगेडचे जवान काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की जवळील इमारतींतील काचादेखील फुटल्याची माहिती मिळत आहे.
घटना लाल किल्ल्यापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर घडल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आली आहे. दिल्ली पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून, मेट्रो सेवा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून स्फोटकाचे स्वरूप तपासले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही कार पार्किंगमध्ये बराच वेळ उभी होती. ती कोणाच्या नावावर होती, तिचा चालक कोण ? याचा शोध घेतला जात आहे. काही सूत्रांच्या मते, हा स्फोट सिलिंडर किंवा बॅटरी शॉर्टसर्किटमुळे झाल्याची शक्यता नाकारलेली नाही, परंतु दहशतवादी साखळीशी संबंधित असण्याची शक्यतादेखील गंभीरतेने तपासली जात आहे. या घटनेनंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. लाल किल्ला परिसर तातडीने रिकामा करण्यात आला आहे आणि पोलिसांनी आसपासच्या सर्व वाहनांची तपासणी सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांत दिल्ली पोलिसांनी आयसिसशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली होती, आणि त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली होती. त्यामुळे लाल किल्ल्याजवळ झालेला हा स्फोट अपघाती आहे की पूर्वनियोजित याचा तपास आता गृहमंत्रालयाच्या देखरेखीखाली सुरु आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) प्राथमिक चौकशीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.



