अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करू शकते, या अपेक्षेमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 575 अंकांनी वाढत 82,605.43 या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 178 अंकांनी वाढून 25,323.55 वर स्थिरावला.
आज मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. रिअल्टी, बँकिंग, पीएसई शेअर्समध्ये खरेदी झाली तर मेटल, एफएमसीजी, इन्फ्रास्ट्रक्चर निर्देशांक वाढीसह बंद झाले. गेल्या सात व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्समध्ये तब्बल 2,360 अंकांची म्हणजेच जवळपास 3% वाढ झाली आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा मूड बदलला आहे.
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील बहुतांश शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. सर्वाधिक खरेदी Bajaj Finance मध्ये झाली. हा शेअर जवळपास 4% ने वधारला. Bajaj Finserv, Trent, Asian Paints, Larsen & Toubro आणि UltraTech Cement हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. याउलट, Tata Motors, Infosys, Axis Bank, Tech Mahindra आणि Maruti Suzuki या शेअर्समध्ये विक्री झाली.
मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये वाढ
फक्त मोठे शेअर्सच नव्हे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही आज खरेदी झाली. Nifty Midcap 100 निर्देशांक 1.11% ने वाढला, तर Nifty Smallcap 100 मध्ये 0.82% वाढ झाली.
रिअल्टी आणि मेटल सेक्टर चमकले
सेक्टरनिहाय पाहता, आज Nifty Media वगळता सर्वच निर्देशांक वाढले. सर्वाधिक तेजी Nifty Realty मध्ये दिसली, जो 3% पेक्षा जास्त वाढला. तसेच PSU Bank, Metal, आणि FMCG निर्देशांकांतही जवळपास 1% वाढ झाली.
शेअर बाजारातील तेजीचे मुख्य कारण
या महिन्याच्या अखेरीस अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. चेअरमन जेरोम पॉवेल यांनी सांगितले की अमेरिकेचा मजूर बाजार अजूनही थोडा घसरलेला आहे, पण अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा चांगली वाढत आहे.
गेल्या वेळी सप्टेंबरमध्ये फेडने व्याजदरात 0.25% (25 बेसिस पॉइंट्स) कपात केली होती. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दरकपातीची अपेक्षा गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत. याशिवाय, रुपयाचे स्थैर्य आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत घट या घटकांमुळेही बाजारात वाढ झाली.