बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील (Belgaum News) एका गावात घडलेली एक (Maharashtra News) विचित्र आणि धक्कादायक घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केल्याने तिच्या आई-वडिलांनी टोकाचा निर्णय घेतला.
त्यांनी आपल्या जिवंत मुलीचं श्राद्ध घातलं आणि नातेवाईकांना घरी बोलावून पंगती वाढल्या.
ही घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील एका गावात घडली आहे. 19 वर्षीय तरुणीचं 29 वर्षीय तरुणावर प्रेम होतं. मात्र या नात्याला घरच्यांचा विरोध होता. घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर ती मुलगी प्रियकरासोबत घरातून पळून गेली. या घटनेनंतर तिच्या आई-वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला. आपल्या संस्कारांचा आणि कुटुंबाच्या सन्मानाचा अपमान झाल्याचं त्यांना वाटलं आणि त्यांनी मुलगी “मेली” असल्याचं जाहीर करत तिचं श्राद्ध करण्याचा निर्णय घेतला.
श्राद्धासाठी त्यांनी विधीपूर्वक तयारी केली. मुलीचे फोटो ठेवून त्यांचं पूजन केलं, नैवेद्य ठेवला आणि मृत व्यक्तीसारखी विधीवत पूजा केली. इतकंच नव्हे, तर नातेवाईक आणि गावातील लोकांना घरी बोलावून श्राद्धभोजनाचं आयोजनही करण्यात आलं. पंगतीत रुचकर जेवण देण्यात आलं, आणि या सगळ्या प्रसंगाला गावातील अनेक लोक साक्षी होते.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समाजात प्रगत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातील या भागात आजही अशा जुनाट मानसिकतेच्या घटना घडत असल्याने अनेकांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे.
मुलगी घरातून पळून गेल्यानंतर कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ती प्रौढ असल्याने आणि स्वतःच्या इच्छेने प्रियकरासोबत गेल्याने कोणतीही जबरदस्ती नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी प्रकरण गुन्हा न ठरवता फाईल बंद केली.
यानंतर संतप्त झालेल्या मुलीच्या वडिलांनी आणि आईने तिच्यासोबतचं नातं संपुष्टात आणल्याचं जाहीर केलं. त्यांनी घरासमोर मोठा बॅनर लावून “भावपूर्ण श्रद्धांजली” असा मजकूर लिहिला आणि मुलीचा फोटो टांगला. गावात या प्रकाराची चर्चा सुरू आहे. अनेकांनी पालकांच्या वेदनेशी सहानुभूती व्यक्त केली असली, तरी अशा टोकाच्या कृतीला समाजमान्यतेचा विरोध होत आहे.
जिवंत मुलीचं श्राद्ध घालणं ही घटना केवळ अंधश्रद्धा किंवा परंपरेचं अंधानुकरण नसून, स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दलच्या आपल्या समाजातील असहिष्णुतेचं जिवंत उदाहरण असल्याचं मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.



