Kyiv drone missile attack : रशिया-युक्रेन युद्धाचा( Russia Ukraine War ) उग्र चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत रशियाने युक्रेनवर जबरदस्त क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ला चढवला. हा हल्ला केवळ लष्करी ठिकाणांपुरता मर्यादित न राहता थेट नागरी वस्त्यांवर झाला. त्यामुळे निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आणि शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. रशियाने कीववर(Kyiv) प्रचंड क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला. युक्रेनियन हवाई दलाने ५६६ ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्रे पाडली.
भीषण हल्ल्याची कहाणी
युक्रेनच्या राजधानी कीवमध्ये मध्यरात्री अचानक आकाशात काळ्या धुराचे ढग दिसू लागले. क्षणभरात स्फोटांचे आवाज घुमू लागले. अनेक निवासी भाग, वैद्यकीय केंद्रे, अगदी एका बालवाडीवरही हल्ल्याचा फटका बसला. शहर प्रशासन प्रमुख तिमूर तकाचेन्को यांनी सांगितले की, या हल्ल्यात किमान १० लोक जखमी झाले, त्यात एका १२ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. त्यांनी आरोप केला की रशिया पुन्हा एकदा निरपराध मुलांना मारण्यास सुरुवात करत आहे.
५०० पेक्षा जास्त ड्रोन आणि ४० क्षेपणास्त्रांचा मारा
युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने एकूण ५९५ ड्रोन, सिम्युलेटेड टार्गेट्स आणि ४८ क्षेपणास्त्रे डागली. मात्र, युक्रेनियन हवाई संरक्षण यंत्रणेने शौर्याने प्रत्युत्तर देत ५६६ ड्रोन व ४५ क्षेपणास्त्रे पाडली किंवा निष्प्रभ केली. तरीदेखील, जे शस्त्र नागरी भागांवर आदळले, त्यांनी प्रचंड नुकसान घडवले.
credit : social media
अनेक शहरांना फटका
अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की कीवसह झापोरिझ्झिया, खमेलनित्स्की, सुमी, मायकोलाईव्ह, चेर्निहिव्ह आणि ओडेसा ही शहरे हल्ल्याने हादरली. झापोरिझ्झियामध्ये एकाच वेळी २७ लोक जखमी झाले, त्यात तीन मुलांचा समावेश आहे. राजधानी कीवमध्ये दोन डझनहून अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे.
जागतिक पटलावर झेलेन्स्कींची आर्त हाक
या हल्ल्यानंतर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर भावनिक भाष्य केले. त्यांनी म्हटले ‘हा हल्ला घृणास्पद आहे. रशियाला शांतता नको आहे, तर युद्ध आणि हत्या कायम ठेवायची आहे हे यातून स्पष्ट होते. यावर जागतिक स्तरावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’ त्यांचे हे विधान महत्त्वाचे ठरत आहे कारण या आठवड्यातच न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची महासभा झाली होती. युद्ध संपवण्याऐवजी हल्ल्यांचा मारा वाढवून रशिया जगाला वेगळाच संदेश देत आहे, असा आरोप झेलेन्स्की यांनी केला.
रशियाची बाजू
या सर्व घडामोडींनंतर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी महासभेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की ‘रशियाचा युरोपवर हल्ला करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, आमच्यावर होणाऱ्या कुठल्याही आक्रमणाला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल.’ लावरोव्ह यांच्या या वक्तव्याने एकीकडे रशियाचा कडक इशारा स्पष्ट झाला, तर दुसरीकडे हल्ल्याच्या निषेधाला ते उत्तर न देताच सरळ बाजू मोकळी करून घेत असल्याचे जागतिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागरी जनजीवन उद्ध्वस्त
कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले की हल्ल्यात २० हून अधिक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. अनेक इमारती कोसळल्या, शेकडो नागरिकांना तातडीने स्थलांतरित करण्यात आले. रात्री उशिरा नागरिक अंधारात आसरा शोधत होते. मुलं रडत होती, वृद्ध लोक घाबरले होते. ही दृश्ये हृदय हेलावून टाकणारी होती. रशिया-युक्रेन युद्ध दोन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. पण आता त्याचा उग्र चेहरा आणखी भयावह होत चालला आहे. नागरी भागांवर थेट हल्ले होऊ लागले आहेत. जागतिक महासत्ता व आंतरराष्ट्रीय संघटनांनी तातडीने पुढाकार घेतला नाही तर या संघर्षाचा किंमत पुन्हा एकदा निरपराध जनतेलाच चुकवावी लागेल.



