सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. दररोज स्वतःचेच रेकॉर्ड मोडत असलेला हा पिवळा धातू ₹1.13 लाखांच्या पुढे गेला आहे, तर चांदी दीड लाख रुपयांचा टप्पा पार करण्याच्या तयारीत आहे
लग्नसराई असलेल्या लोकांची मात्र चिंता वाढली आहे.
नवरात्रीच्या काळात थोडीशी घसरण दिसून आली असून आज सोन्याचा भाव ₹1,13,580 प्रति 10 ग्रॅमवर आला आहे, जो कालच्या तुलनेत कमी आहे. जीएसटी स्लॅबमध्ये बदल झाल्यानंतर स्वस्त सोने मिळेल अशी अपेक्षा होती, पण सरकारने सोन्या चांदीला या सवलतीतून वगळले.
GST बदलांचा सोन्यावर परिणाम नाही
22 सप्टेंबरपासून नवा जीएसटी स्लॅब लागू झाला असला तरी सोने किंवा चांदीवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. सोन्यावर अजूनही 3 % जीएसटी लागू आहे. यात 1.5% सेंट्रल आणि 1.5% स्टेट जीएसटीचा समावेश आहे. याशिवाय मेकिंग चार्जवर 5% जीएसटी वेगळा आकारला जाईल. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीसारख्याच दराने कर भरावा लागेल.
भाव कोसळणार का? तज्ज्ञांचा इशारा
सोने ज्या वेगाने वाढत आहे, त्यावरून तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे वर्ष संपण्यापूर्वी दर ₹1.5 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतात. जिओपॉलिटिकल तणाव, डॉलरची घसरण आणि सेंट्रल बँकांकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेली खरेदी यामुळे सोन्याला बळ मिळत आहे. मागील सहा वर्षांत सोन्याची किंमत तिप्पट झाली आहे, आणि यावर्षीच ती 40% ने वाढली आहे. यामुळे तज्ज्ञ आता फुगा फुटण्याची भीती व्यक्त करत आहेत.
फुगा कधीही फुटू शकतो
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनी इशारा दिला आहे की सोने, क्रिप्टो आणि शेअर बाजारातील वाढ हा मोठ्या आर्थिक फुग्याचा भाग असू शकतो. त्यांच्या मते, हे सर्व ऍसेट्स रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत आणि हा फुगा कोणत्याही क्षणी फुटू शकतो.
ICICI प्रुडेन्शियलचे एस. नरेन यांनीही असा इशारा दिला की अशा वेगाने वाढणाऱ्या भावांमुळे पुढे मोठे नुकसान होऊ शकते.
पुढचा मार्ग कोणता?
काही बाजार तज्ज्ञांचा अंदाज आहे की सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते, तर दुसरीकडे Jefferies च्या मते, सोने ₹2 लाख प्रति 10 ग्रॅमच्या वरही जाऊ शकते. सध्याचा व्यापक कल सकारात्मक असला तरी फुगा फुटण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. सोन्यात गुंतवणूक करताना सध्या अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अल्पावधीत नफा मिळवू पाहणाऱ्यांनी भावातील अस्थिरता लक्षात घेतली पाहिजे, तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बाजारातील बदलत्या संकेतांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.



