‘मराठा धरून ओबीसी लोकसंख्या ६० टक्के आहे. बत्तीस टक्के आरक्षणात तुम्ही वेगळे प्रवर्ग केले, ते सगळे प्रवर्ग रद्द करायला पाहिजेत.आमच्या तरी नोंदी आहेत, तुमच्या तर नोंदी नाहीत, काहीही नाहीत, असा टोला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आज (दि.१३) पत्रकारांशी बोलताना अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.
गायकवाड आयोगाने मराठा समाज मागास सिद्ध केलेला आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु राज्य सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिले आहे, ते ५० टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे आम्ही वारंवार सांगत आहे की ५० टक्क्यांच्या वर गेलेले आरक्षण टिकत नाही. देणारे तेच आहेत आणि घेणारे तेच आहेत, सगळे सरकारचेच लोक आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण हक्काचं आहे आणि ते आम्ही मिळवलं आहे.
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण कसं पुरेल?
मराठ्यांना एक आरक्षण आहे, दोन आरक्षण आहे, तीन आरक्षण आहे असं जर प्रत्येक क्षेत्रात वाटत असेल आणि त्या क्षेत्रातून सुद्धा जर असे प्रश्न विचारले जात असतील, तर हे वेदनादायी आहे. आमचा समाजच तेवढा शिल्लक आहे त्यामुळे १० टक्के आमच्या संख्येनुसार पुरत नाही. ओबीसीत असून सुद्धा संख्येने आम्ही संपूर्ण राज्यात ५० /५५ टक्के आहे. या समाजाला दहा टक्के आरक्षण कसं पुरेल? त्यामुळे तुम्हाला दोन-तीन प्रकारचे आरक्षण आहे असं म्हणणं नेत्यांना शोभत नसल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे यावेळी बोलताना म्हणाले.
अन्यथा सरकारला परीणाम भोगावे लागतील
राज्य शासनाने अचानक सारथी संस्थेतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने राज्यातील सुमारे ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद होणार आहे.भुजबळांचं ऐकून मराठ्यांच्या पोरांवर अन्याय करू नका.याबाबत आम्ही सरकारला कळवलं आहे.पोरांचे पैसे द्या, अन्यथा सरकारला परीणाम भोगावे लागतील असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.



