लातूर : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आरोपी पती जिया उल हक ने आपल्या 4 साथीदाराच्या मदतीने फरीदाच्या छातीवर बसून, तोंडावर उशी दाबून खून केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
लातूर जिल्ह्यातील वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकूर-शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीच्या पुलाखाली एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
परिसरातील शेतकऱ्यांना उग्र वास आल्याने ही घटना उघडकीस आली होती. मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटवणे अवघड झाले. मात्र अखेर या महिलेच्या खुनाचा उलगडा लावण्यात लातूर पोलिसांना यश आलं आहे. फरीदा खातून असं हत्या झालेल्या २३ वर्षीय महिलेचं नाव असून ती मूळची उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. ती आणि तिचा 34 वर्षीय पती जिया ऊल हक उदगीर जवळील विलास साखर कारखाना परिसरात कामगार म्हणून काम करीत होते.
मूळचे उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील हे दोघे आपल्या दोन मुलांसह राहत होते. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती ही पोलिस अधीक्षक तांबे यांनी दिली आहे.



