सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याने लॉजच्या रूममध्ये एका महिलेचा विनयभंग करत किळसवाणे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने सोलापूर शहरातील (Solapur News) फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मनोहर सपाटे असे गुन्हा दाखल झालेल्या राजकीय नेत्याचे नाव असून, तो सोलापूरचा माजी महापौर देखील राहिला आहे. तो सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सदस्य देखील आहे. शहरातील एका लॉजमध्ये महिलेसोबत किळसवाणे कृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेने सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोहर सपाटे याच्याविरुद्ध एका ४५ वर्षीय विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करत विनयभंग करणे, तसेच दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार महिला पुणे येथे वास्तव्यास आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका गावात त्यांचा शेतीच्या वादामुळे न्यायालयीन खटला सुरू आहे. न्यायालयीन कामासाठी पीडित महिला सोलापूरमध्ये वकिलांना भेटण्यासाठी येत असतात. १४ जून रोजी पीडित महिला माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये राहिल्या होत्या. सुरुवातीचे दोन दिवस त्या रूम नंबर २०२० मध्ये थांबल्या, तर पुढील दोन दिवस त्या रूम नंबर २०५ मध्ये राहिल्या.
राष्ट्रवादीचा नेता व माजी महापौर मनोहर सपाटे याने १६ जूनच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास लॉजमधील रूमचा दरवाजा ठोठावून महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेशी त्याने अश्लील हावभाव करत विनयभंग केला.
पीडित महिलेने घाबरून ‘तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, असे का करता?’ असे विचारले, तेव्हा आरोपीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, ‘तू कुठेही तक्रार केली, तरीही मला काही फरक पडत नाही. कारण माझे वय जास्त असल्यामुळे मला जामीन मिळतो,’ असे सांगत दमदाटी केली, ज्यामुळे पीडितेला अधिक भीती वाटू लागली.
संशयित आरोपी मनोहर सपाटे याने वारंवार मोबाईलवरून संपर्क साधत पीडितेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करत होता. या त्रासाला कंटाळून पीडित महिला २४ जून रोजी ॲड. योगेश पवार यांचा सल्ला घेण्यासाठी सोलापूरमध्ये आल्या होत्या. त्याचवेळी पीडितेला सपाटेचा फोन आला. त्याने लॉजवरील रूम नंबर ३०७ वर येण्याचा आग्रह केला. त्यावेळी पीडितेने ‘स्टिंग ऑपरेशन’ (Sting Operation) करण्याचे ठरवले. २४ जून रोजी संध्याकाळी पीडितेने रूम नंबर ३०७ मध्ये जाऊन सपाटेच्या कृत्याचे व्हिडिओ काढले. त्या व्हिडिओत सपाटे हा पीडितेसोबत अश्लील कृत्य करताना दिसून येत आहे. या व्हिडिओतील पुराव्याच्या आधारे २५ जून रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार सपाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.



