नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या कन्हानमध्ये 19 वर्षीय अंकिता नामक तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 8 जूनला तारखेच्या दुपारच्या सुमारास घडली. 9 जूनला शवविच्छेदनानंतर अंकितावर अंत्यसंस्कार सुरू होता.
एवढ्यातच अनुराग मेश्राम या तरुणाने तिच्या सरणावर जाऊन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी अनुराग मेश्रामला चांगलाच चोपला. यानंतर अनुराग सध्या कामठी परिसरात एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
अंकिता आणि अनुराग एकाच गावातील असून दोघांमध्ये प्रेम होतं. मात्र प्रेमाची वाट पुढे अडचणीची असल्याने अंकिताने राहत्या घरी रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. यामध्ये अंकिताने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये माझ्या मृत्यूसाठी अनुराग मेश्रामला जबाबदार धरू नये. आणि अनुरागला काहीही करू नये असा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अंकिताचं शवविच्छेदन पार पडल्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. तिच्यावर अंत्यविधी पार पाडत असताना अचानक अनुराग मेश्राम हा तिथे पोहोचला. त्याने शरणावर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृत्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले संतापले. अनुरागला बाजूला करत चांगला चोपला.
घटनेच्या माहितीनंतर अनुरागच्या वडील आणि भावानी त्याला लगतच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. सरणावर उडी घेत असताना त्याने कुठलेतरी द्रव्य प्राशन केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वैद्यकीय अहवालानंतरच या सगळ्या बाबीचा खुलासा होणार असल्याची माहिती पुढे येत आहे.



