कॅब बुक करणाऱ्या मुलींना लक्ष्य
करणाऱ्या एका टॅक्सी ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे. या नराधम टॅक्सी ड्रायव्हरने ५० पेक्षा जास्त मुलींना वासनेचा बळी बनवले होते.
त्याच्या मोबाईल फोनमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त अश्लील व्हिडीओ आणि फोटो असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका तरुणीला पळवून नेताना आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, ५४ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हर एका तरुणीला झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यावर अत्याचार करण्याच्या बेतात होता. तरुणीला बेशुद्ध करुन आरोपीने तिला स्वत:च्या घरी नेले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हरला अटक केली. महिला प्रवाशाला अंमली पदार्थ पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप टॅक्सी ड्रायव्हरवर करण्यात आला.
अधिकच्या तपासासाठी पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला. मोबाईल फोन तपासताना पोलीस थक्क झाले. त्याच्या मोबाईलमध्ये ५० पेक्षा जास्त महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ आणि फोटो होते. मुलींना कॅबमध्ये बसवल्यानंतर आरोपी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्यांना झोपेच्या गोळ्या देत असे. त्या बेशुद्ध पडल्या की, घरी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. आरोपी अत्याचार करताना संपूर्ण कृती कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करायचा, अशी माहिती चौकशीदरम्यान पोलिसांना मिळाली.
काही काळापूर्वी, आरोपीने एका २० वर्षीय तरुणीला पाण्यात झोपेच्या गोळ्या टाकून फसवले. ती बेशुद्ध झाल्यानंतर स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या केसांमधून पोलिसांना ड्रग्सचे पुरावे देखील सापडले. त्यानंतर तपास करुन पोलीस टॅक्सी ड्रायव्हरपर्यंत पोहोचले. टॅक्सी ड्रायव्हरच्या मोबाईलमध्ये १७ ते १८ वर्षांपूर्वीचे अत्याचाराचे व्हिडीओ आढळले आहेत. सदर घटना जपानमध्ये घडली आहे.