भारतीय लोक नाश्त्याला इडली आणि दोसा पसंत करतात. इडली-दोसा चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. पण काही लोक इडली किंवा दोसा खाल्ल्यावर पोटात प्रचंड गॅस किंवा फुगवटा येतो अशी तक्रार करतात.
यामुळे त्यांना आवडत असूनही आवडता पदार्थ खाता येत नाही. जर तुम्हीही अशा समस्येने त्रस्त असाल तर पौष्टिकतज्ज्ञांनी सांगितलेला उपाय पाहा…
तज्ज्ञ काय म्हणतात?
फेमस न्युट्रिशन एक्सपर्ट श्वेता शा यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्या म्हणतात की, ‘इडली आणि दोसा हे दोन्हीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे आरोग्यदायी नाश्त्यांपैकी एक मानले जाते. पण, बहुतेक लोक इडली-दोसा खाताना काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना पोटात गॅस, फुगवटा आणि अपचन अशा समस्यांना सामोरे जावे लागते.’
ती चूक कोणती?
आजकाल बहुतेक लोक वेळ वाचवण्यासाठी रेडिमेड इडली-दोसा बॅटर खरेदी करू लागले आहेत असं पौष्टिकतज्ज्ञ सांगतात. पण ही चूक तुमच्या आरोग्यावर परिणाम करते.
रेडिमेड इडली-दोसा पीठ खरेदी करू नये का?
दीर्घ आंबवण
श्वेता शा यांच्या मतानुसार, रेडिमेड इडली-दोसा बॅटर बहुतेकदा १२ तास किंवा त्याहून अधिक वेळ आंबवले जाते. यामुळे पीठात गॅस निर्माण करणारे जीवाणू वाढतात. अशा वेळी तुम्ही या पीठापासून बनवलेली इडली किंवा दोसा खाल्ल्यावर, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या सुरू होते. कोणतेही पीठ ७-८ तासांपेक्षा जास्त वेळ आंबवू नये आणि २४ तासांच्या आत वापरावे.
बोरिक अॅसिडचा वापर
आंबवलेल्या बॅटरला वास येऊ नये म्हणून काही रेडिमेड पीठात बोरिक अॅसिडसारखे रसायन वापरले जाते. पण बोरिक अॅसिड तुमच्या पोटासाठी चांगले नाही. त्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. म्हणून, बोरिक अॅसिड किंवा इतर रसायने असलेले पीठ टाळावे.
इ.कोलाय बॅक्टेरिया
याशिवाय, काही लोक बॅटर आंबवण्यासाठी इ.कोलाय बॅक्टेरिया घालतात असं श्वेता शा सांगतात. इ.कोलाय दीर्घकाळ राहिल्यास ते जास्त गॅस निर्माण करते आणि इतर पोटाच्या समस्याही निर्माण करते.
मग काय करावे?
पौष्टिकतज्ज्ञ नेहमी घरीच बॅटर बनवण्याचा सल्ला देतात, ज्यामुळे गॅसची समस्या टाळता येते आणि आरोग्यालाही हानी पोहोचत नाही. श्वेता शा यांच्या मते, बाजारातून दोसा किंवा इडली पीठ खरेदी करू नका. तुम्ही घरी तांदूळ आणि उडीद डाळ वापरून सहज पीठ बनवू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा…
* प्रथम तांदूळ आणि उडीद डाळ चांगले धुवून स्वच्छ करा आणि नंतर भिजवा.
* बॅटर ७-८ तास आंबवा आणि २४ तासांच्या आत वापरा.
* बॅटर बनवताना त्यात कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह्ज घालू नका.
* बॅटर जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नका.
* अशाप्रकारे पीठ बनवून इडली-दोसा खाल्ल्याने तुम्हाला गॅस किंवा आम्लपित्त होणार नाही.