भरधाव वेगात क्रेटा कार रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की कारच्या चेसिसचे दोन तुकडे झाले होते. तर एअरबॅग्स फुटून कारमध्ये पुढे बसलेले दोघेजण डॅशबोर्डमध्ये अडकले होते.
या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. भोपाळ शहरात ही दुर्घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका ढाब्यावरून तिन्ही तरूण परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला. भरधाव गाडीवरचं नियंत्रण सुटून कार झाडाला धडकली. धडकेनंतर कारचे दोन तुकडे झाले. यातला काही भाग तर झाडापासून पुढे उडून पडला होता. अपघातात प्रीत आहुजा, विशाल डाबी आणि पंकज सिसोदिया यांचा जागीच मृत्यू झाला. या तिघांचंही वय २५ वर्षे इतकं होतं. तर राहुल कंडारे हा गंभीर जखमी झाला आहे.
अपघातावेळी कारचा वेग १२० किमी प्रतितास यापेक्षा जास्त होता अशी माहिती समोर येत आहे. प्रीत कार चालवत होता तर त्याच्या शेजारी विशाल बसला होता. कार झाडाला धडकल्यानंतर एअरबॅग्स उघडल्या. पण स्पीड इतकं होतं की एअरबॅग्ज फाटून पुढच्या सीटवरचे दोघे डॅशबोर्डमध्ये अडकले. कारची चेसिस तुटून दोन भाग झाले होते.
कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी एक तास प्रयत्न करावे लागले. कुटुंबियांनी सांगितलं की सगळे शाळेपासूनचे मित्र होते. काही कामानिमित्त ते कारने सिहोरला गेले होते. परतताना ढाब्यावर जेवले आणि घरी परतत असताना हा अपघात झाला.