बीड : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून बीड येथे दत्ता भरणे यांनी ध्वजारोहण करून मानवंदना स्वीकारली. परंतु या कार्यक्रमाला आंदोलकांमुळे गालबोट लागले.
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याच्या समोर एका तरुणाने डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
बीडमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयावरील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार संदिप क्षीरसागर यांच्यासह जिल्हाधिकारी अविनाश पाठक , पोलीस अधीक्षक नवनीत कावत,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे असल्याची ग्वाही देत शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे भरणे म्हणाले.
ध्वजारोहणावेळी राडा, भरणेंचा ताफा अडवून आत्मदहनाचा प्रयत्न
बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा या मागणीसाठी एक तरुण चांगलाच आक्रमक झाला होता. नितीन मुजमुले नावाच्या तरुणाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला आडवे जात नितीन मुजमुले नावाच्या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयात ध्वजारोहण
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय मैदान येथे पार पडला. अलिबागमधील पोलिस परेड ग्राउंड वर पोलीसांकडून त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी पोलिस दलातील जीपला आकर्षक सजावट करून त्यामधून परेड मैदानात आदिती तटकरे यांनी फेरफटका मारला. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, सीईओ, माजी आमदार अनिकेत तटकरे आणि इतर प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्गात नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस मैदानावर ७६ वा प्रजासत्ताक दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी सिंधुदुर्ग पोलीस दल, गृहरक्षक दल, स्काऊट गाईड, एनसीसी यांच्या पथकाने संचलन करत मानवंदना दिली. तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.