बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरु आहे. मात्र, अशातच बीड प्रकरणाला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, संतोष देशमुख हा चांगला कार्यकर्ता होता. त्याची अतिशय निर्घृण हत्या झाली. आमदार सुरेश दस यांनी सांगितल्यावर अंगावर शहारे येत होते. त्यांची एक सुद्धा अशी जागा नव्हती की जी काळी निळी झाली नव्हती. कोणी म्हणत आहे की लाईटरने त्यांचे डोळ्यांना जाळण्यात आले. ही पद्धत आहे का मारण्याची.
दरम्यान, या प्रकरणी वेगवेगळ्या एसआयटी देखील स्थापन करण्यात आल्या. यानंतर या प्रकरणात कोण दोषी आणि कोण निर्दोष हे बाहेर येईल. पण हा प्रश्न जो आहे तो ओबीसी आणि मराठी असा नाहीये. तो माणुसकीचा प्रश्न आहे. ज्यांनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. असं म्हणणारा मी आहे. परंतु, मला आमच्या संपूर्ण मराठा समाजाच्या नेत्यांना एक विनंती करायची आहे. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी त्यांना देखील मारण्यात आलं. दोघेही माणसं होती. दोघांसाठी आता सर्वांनी लढूया. हा सामाजिक प्रश्न घेऊ नका. हा गुन्हेगारवृत्ती विरुद्धी माणुसकीने लढणारे लोक असा विषय का घेऊ नये आपण. एखाद्या समाजाच्या एखाद्या माणसाने जर गुन्हा केला असेल तर संपूर्ण समाज कसा काय तुम्ही दोषी ठरवू शकता.
वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ?
आमचे देखील अनेक कार्यकर्ते असतात. त्यामधील एखादा कार्यकर्ता बाहेर जावून काय करतो हे आम्हाला देखील माहित नसतं आणि त्यांची जबाबदारी देखील आमच्यावर नसते. कोणीही फोटो काढण्यासाठी पुढे पण त्याचं पुढे काय काम धंदा आहे हे कोणाला माहिती नसतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतील तर शहानिशा करा. धनंजय मुंडे देखील म्हणत आहेत की चौकशी करा. जर त्यांची चूक असेल तर त्यांना शिक्षा द्या. मात्र, साप म्हणून भूई थोपटणं योग्य नाही.
पालकमंत्री पद देणं न देणं हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला निर्णय आहे. अनेक ठिकाणी तिकडचा मंत्री दुसऱ्या ठिकाणचा पालकमंत्री तर दुसऱ्या ठिकाणी वेगळाच पालकमंत्री हे सर्व झालयं त्याबद्दल मला काही माहिती नाहीये.