दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी 135 अंकांनी घसरून 24205 वर तर सेन्सेक्स 553 अंकांनी घसरून 79389 अंकांवर बंद झाला.
निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये Ciplaहा सर्वात जास्त वाढला होता. तो सुमारे 9.5% च्या वाढीसह बंद झाला.
याशिवाय एलटी, ओएनजीसी आणि डॉ. रेड्डीज यांसारख्या शेअर्समध्येही वाढ झाली. आयटी शेअर्स दबावाखाली आहेत. एचसीएल टेकमध्ये सर्वाधिक 3.6 टक्के घसरण झाली आहे. याशिवाय टेक महिंद्रा, टीसीएस आणि एशियन पेंट्सवरही दबाव दिसून आला.
मार्केटमध्ये 1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक
देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ऑक्टोबरमध्ये भारतीय इक्विटी मार्केटमध्ये 1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. DII ची आजपर्यंतची ही सर्वाधिक मासिक खरेदी आहे. DII ने ही खरेदी अशा परिस्थितीत केली आहे जेव्हा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) त्यांची विक्री करत आहेत.
FII ने ऑक्टोबर महिन्यात एकूण 85,000 कोटी रुपयांची (11 अब्ज डॉलर) विक्री केली आहे. त्याच वेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुमारे 4.41 लाख कोटी रुपये झाली आहे.
अलीकडील DII डेटा इक्विटीकडे वाढणारा कल दर्शवत आहे. इक्विटी मार्केटमध्ये म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा वाढत आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महागडे मूल्यांकन आणि एफआयआयची विक्री असूनही, किरकोळ गुंतवणूकदारांकडून बाजाराला चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे बाजारात मोठी घसरण झालेली नाही.
आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले तर 4 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. तर एका कंपनीचा शेअर कोणताही बदल न करता बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 50 मधील 50 शेअर्सपैकी 34 कंपन्यांचे शेअर्स नुकसानासह लाल रंगात आणि उर्वरित 16 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले.
कोणते शेअर्स वाढले?
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्सनी आज सर्वाधिक 6.38 टक्के वाढ नोंदवली. पॉवरग्रिडचे शेअर्स 0.86 टक्क्यांच्या वाढीसह, जेएसडब्ल्यूचे शेअर्स 0.76 टक्क्यांच्या वाढीसह आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 0.71 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर HDFC बँकेचे शेअर्स आज कोणताही बदल न होता बंद झाले.
दुसरीकडे, टेक महिंद्राचा शेअर आज कमाल 4.54% घसरणीसह बंद झाला. एचसीएल टेकचे शेअर्स 3.89 टक्के, टीसीएस 2.80 टक्के, इन्फोसिस 2.48 टक्के, एशियन पेंट्स 1.97 टक्के, मारुती सुझुकी 1.59 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.57 टक्के, अदानी पोर्ट्स 1.45 टक्के, भारती एअरटेल 1.34 टक्के, ॲक्सिस बँक 1.20 टक्के घसरणीसह बंद झाले.
याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील, सन फार्मा, इंडसइंड बँक आणि एनटीपीसी यांचे शेअर्सही घसरणीसह बंद झाले.