सकाळी सुरुवातीच्या टप्प्यातली तेजी वगळता, आज, सोमवारीदेखील (21 ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजार दबावात होते. सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ घसरणीसह लाल रंगात बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी विक्री झाली.
बीएसई मिडकॅप 1.63 टक्के, तर स्मॉलकॅप इंडेक्स 1.51 टक्के घसरून बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची संपत्ती आज सुमारे 4.80 लाख कोटी रुपयांनी घटली. ऑटो हे क्षेत्र वगळता सर्व सेक्टोरल इंडेक्सदेखील लाल रंगात बंद झाले.
कामकाजाच्या अखेरीला बीएसई सेन्सेक्स 73.48 अंक म्हणजेच 0.09 टक्के घसरणीसह 81,151.27च्या पातळीवर बंद झाला. एनएसईचा 50 शेअर्सचा निफ्टी हा इंडेक्स 72.95 अंक म्हणजेच 0.29 टक्के घसरून 24,781.10च्या पातळीवर बंद झाला.
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 21 ऑक्टोबर रोजी 453.35 लाख कोटी रुपयांवर आलं. ते शुक्रवारी, 18 ऑक्टोबर रोजी 458.15 लाख कोटी रुपये होतं. अशा प्रकारे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 4.8 लाख कोटी रुपयांनी घटलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचं तेवढं नुकसान झालं आहे.
सेन्सेक्सचे सर्वाधिक वाढलेले शेअर्स
बीएसई सेनेक्सच्या 30पैकी फक्त 9 शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले. त्यात एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 2.83 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी राहिली. त्याखालोखाल एशियन पेंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती सुझुकी हे शेअर्स 1.58 टक्क्यांपासून 0.46 टक्क्यांपपर्यंतच्या तेजीसह बंद झाले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरणारे पाच शेअर्स
सेन्सेक्सचे बाकीचे 21 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. त्यात कोटक महिंद्रा बँकेचा शेअर 4.29 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लूझर ठरला. बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्ये 1.93 टक्क्यांपासून 3.05 टक्क्यांपर्यंतची घसरण पाहायला मिळाली.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर आज घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक राहिली. एक्स्चेंजवर आज एकूण 4175 शेअर्समध्ये व्यवहार झाले. 1129 शेअर्स तेजीसह, 2906 शेअर्स मंदीसह, तर 140 शेअर्स चढउताराविना बंद झाले. 254 शेअर्सनी आज आपल्या 52 आठवड्यांतल्या सर्वोच्च पातळीला, तर 71 शेअर्सनी 52 आठवड्यांतल्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.