ज्युबिलंट भरतिया समूहाचे प्रवर्तक श्याम आणि हरी भरतिया हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (HCCB) मधील 40 टक्के भागभांडवल विकत घेण्याची योजना आखत आहेत. हा करार पूर्ण करण्यासाठी 12,500 कोटी रुपये लागतील, ज्यासाठी ते मालमत्ता व्यवस्थापक, म्युच्युअल फंड आणि परदेशी बँकांशी बोलणी करत आहेत.
रिलायन्सची उपकंपनी कॅम्पा कोलाचे प्राईज धोरण आणि किरकोळ विक्रेत्यांना जास्त मार्जिन देण्याच्या नियोजनामुळे भारतीय बाजारपेठेत खळबळ उडाली असताना ही बातमी समोर आली आहे. यामुळे बाजारपेठेतील स्पर्धा तर वाढली आहेच, शिवाय अनेक मोठ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीमध्ये बदल करण्यास भाग पाडले आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट, एरेस मॅनेजमेंट, बेन कॅपिटल आणि कोटक अल्टरनेट ॲसेट मॅनेजर यांच्याशी किमान एक तृतीयांश रक्कम म्हणजे 4,000-5,000 कोटी रुपये उभारण्यासाठी चर्चा सुरू आहे.
कोका-कोला अनेक महिन्यांपासून HCCB विकण्याची योजना आखत आहे. ही बातमी पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात आली. त्यानंतर असे सांगण्यात आले की, अमेरिकन कंपनी कोका-कोला भारतातील तिच्या उपकंपनी हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (HCCB) चे मूल्य अनलॉक करत आहे. त्यावेळी डाबर ग्रुप, ज्युबिलंट फूड वर्क्स, पिडीलाइट इंडस्ट्रीज आणि एशियन पेंट्स या देशातील चार मोठ्या उद्योगपतींशी चर्चा सुरू होती.
पण डाबर आणि जुबिलंट यांना फूड आणि पेय उद्योगात काम करण्याचा अनुभव आहे, त्यामुळे हे समूह या कराराला मान्यता देऊ शकतात, असा विश्वास होता. मात्र, याबाबत अद्याप या कंपन्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.