सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीला जोरदार मागणी असते. दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 550 रुपयांनी महागले आहे. आता एक तोळा सोन्याचा भाव 79,900 रुपयांवर पोहोचला आहे.
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने ही माहिती दिली आहे. चांदीच्या दरातही सुमारे 1000 रुपयांची वाढ झाली आहे.
गुरुवारी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 99.9 % शुद्धतेचे सोने 79,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली. त्यामुळे सोन्याने 550 रुपयांची वाढ घेत प्रति 10 ग्रॅम 79,500 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. गेल्या सत्रात सोने 78,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. दरम्यान, चांदीचा भाव 1,000 रुपयांनी वाढून 94,500 रुपये किलो झाला.
बाजार तज्ञ काय म्हणतात?
सणासुदीच्या काळात ग्राहकांची खरेदीची वर्दळ असते. त्यामुळे देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. दुसरीकडे, पश्चिम आशियातील तणाव आणि आगामी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमुळे अनिश्चितता असताना गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानत आहेत आणि त्यात सातत्याने पैसे गुंतवत आहेत. MCX मध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत 1,231 रुपये किंवा 1.34 टक्क्यांनी वाढून 92,975 रुपये प्रति किलो झाली आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी रिसर्च) मानव मोदी म्हणाले, अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी, सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे बाजारात आणि देशांतर्गत आघाडीवर सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या.
तसेच, युरोपियन सेंट्रल बँकेने व्याजदरात कपात केल्यानेही यात वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचे भाव 0.76 टक्क्यांनी वाढून 2,728.10 डॉलर प्रति औंस झाले. आशियाई बाजारात चांदीचा भाव 1.70 टक्क्यांनी वाढून 32.32 डॉलर प्रति औंस झाला.