बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यात 44 टक्क्यांनी वाढ, तिमाही निकालातून माहिती समोर; वाचा… सविस्तर!
महाराष्ट्रातील आघाडीची सरकारी बँक ऑफ महाराष्ट्रने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.
यानुसार बँकेचा निव्वळ नफा 44 टक्क्यांनी वाढून 1,327 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. व्याज उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कंपनीचा नफा वाढला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत बँकेने 920 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.
शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता
बँक ऑफ महाराष्ट्रने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 6,809 कोटी रुपये झाले आहे. जे गेल्या वर्षी 2023-24 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत 5,736 कोटी रुपये इतके होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे निकाल जाहीर झाल्यानंतर बॅंकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारच्या निकालादरम्यान बीएसईवर बँकेचे शेअर्स 22 पैशांच्या वाढीसह 54.38 रुपयांवर बंद झाले आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक 73.50 रुपये आणि विक्रमी नीचांकी 38.69 रुपये आहे. आता पुन्हा एकदा स्टॉक वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या बँकेचे मार्केट कॅप 41,826 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
बँकेचा एनआयएम 3.98 टक्क्यांपर्यंत वाढला
बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांनी सांगितले आहे की, निव्वळ व्याज मार्जिन 3.98 टक्के वाढले आहे. जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 3.88 टक्के होते. सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे निव्वळ व्याज मार्जिन सर्वाधिक आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेचा निव्वळ नफा 5,000 कोटींच्या पुढे जाईल, अशी बँकेला अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या सप्टेंबर तिमाहीत बँकेची एकूण नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता 1.84 टक्क्यांवर आली आहे. जी एका वर्षापूर्वी 2023-24 च्या याच तिमाहीत 2.19 टक्के होती.
एनपीएमध्येही घट
निव्वळ एनपीए म्हणजेच बुडीत कर्जे 0.20 टक्क्यांपर्यंत कमी झाली. जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 0.23 टक्के होती. दरम्यान, बँकेचे खर्च ते उत्पन्न गुणोत्तर 38.81 टक्क्यांवर स्थिर राहिले आहे. जे स्थिर खर्च व्यवस्थापन दर्शवते. मालमत्तेवर परतावा 1.74 टक्क्यांपर्यंत सुधारला आणि इक्विटीवरील परतावा 26.01 टक्क्यांपर्यंत वाढला. भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 17.26 टक्के आहे. ज्यापैकी टियर 1 भांडवल 13.13 टक्के आहे. 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या सहामाहीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यात 818 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या 1,802 कोटींच्या तुलनेत हा वाढून 2,620 कोटी रुपये झाला आहे.